अध्याय - ३६

 ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय - ३६


वेदांत शर्मा वृत्तांत - मातंगी उपासना


मी व धर्मगुप्तआम्हाला बक्षीस मिळालेले पैंजण घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. पैंजणातून निघणारे सुश्राव्य संगीत माझ्या हृदयात प्रतिध्वनित होत होते. हृदयात असलेल्या अनाहत चक्रातून “ॐ''कार सहजपणे ऐकू येतो, असे आम्ही ऐकले होते. पण आदल्या रात्री रात्रभर श्रीपादांच्या पायातील त्या पैंजणांचा आवाज, राग तालबद्ध अशा संगीतासारखा ऐकू येत होता. अनाहत चक्रापासून ती शक्ती इतर चक्रांमध्ये प्रसारित होत असते. त्यावेळी शरीरातील नसा नसातून नूतन शक्ती प्रकट झाल्यासारखे वाटते.


आम्ही चालत असलो की तो पैंजणांचा ध्वनी ऐकू यायचा, आम्ही थांबलो तरी तो ध्वनी ऐकू येत होता. चालत असताना एक आश्रम आम्हाला दिसला. तसेच त्याच्या पलिकडे एक गाव असल्याचेही जाणवले. अस्पृष्य जातीची घरे गावाच्या बाहेरच असतात. त्या वस्ती जवळच हा आश्रम कसा काय असावा? असे आम्हाला वाटले. आश्रम जवळ येताच पैंजणाचा नाद थांबला. आता काही विशेष घडणार असे वाटले.


इतक्यात त्या आश्रमातून ६० वर्षांचे एक महर्षी बाहेर आले.ते फार तेजस्वी दिसत होते. त्यानंतर ३० वर्षाच्या एक योगिनी माता बाहेर आल्या. त्या दोघांनी आमचे आदरपूर्वक स्वागत केले. महर्षी सांगू लागले, “माझे नाव वेदांत शर्मा. मी पीठिकापुरचा राहणारा आहे. सध्याचे माझे नाव बंगारय्या व हिचे नाव बंगारम्मा. मी जन्माने ब्राह्मण व ही चांभार आहे. आमच्याकडे मातंगी मातेचे पीठ आहे. दशमहाविद्येतील मातंगिनी देवीची आम्ही आराधना करीत असतो. हे ऐकून माझ्या अंगावर शहारेच आले. स्वतः ब्राह्मण आहे, म्हणतो व स्त्री चांभार आहे, असे म्हणतो. यांचे दांपत्य जीवन धर्मसंमत कसे? असा प्रश्न पडला. त्यांनी आम्हाला कंदमुळे व फळे खायला दिली. नंतर बंगारय्या म्हणाले, “अहो अरुंधतीने वशिष्ठांना तिच्याशी लग्न करायला सांगितले असता, ते म्हणाले “मी तुझ्या शरीराचे काहीही केले तरी तू काही म्हणायचे नाही.'' महर्षीनी तिला सात वेळा दग्ध | केले व पुन्हा जीवंत केले. रुंधन म्हणजे अडवणे. तिने त्यांना कधीच अडवले नाही म्हणून ती अरुंधती नावाने प्रसिद्ध झाली. त्यानंतर महर्षीनी तिचा धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला.


मी पीठिकापुरला असताना माझे तीन वेळा लग्न झाले. पण माझ्या तीनही बायका वारल्या. हे माझे दुर्दैव, असे म्हणून मी चिंता करीत असताना श्रीपाद हसत मला म्हणाले, “आजोबा, मी तुमच्यासाठी एक आजी पाहिली आहे. तिच्याशी लग्न न करता तिचा धर्मपत्नी म्हणूनस्वीकार केला तर मी तुम्हाला उत्तम जन्म प्रसाद म्हणून देईन."


पीठिकापुरच्या ब्राह्मण सभेचे अध्यक्ष बापन्नार्य होते. श्रीपादांचे बोलणे ऐकून अध्यक्षांनी वेदपंडितांची सभा आयोजित करावी, असा ठराव गावातील ब्राह्मणांनी मांडला. त्या सभेत धर्म व कर्माविषयी सूक्ष्म चर्चा करून हा निर्णय घ्यावा असे ठरले. सर्व पंडितांना बोलावण्याचे ठरले. ती जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. श्रीपादांनी उपनयन झाल्यावर एक दिवसही न वेदपठन केले होते, न कधी संथा घेतली होती. मात्र त्याची परीक्षा घेण्यासाठी कोणी कितीही अवघड प्रश्न विचारला, तरी त्याचे अचूक उत्तर तो द्यायचा. बापन्नार्यांना येत असलेले सर्व वेद, वेदांत, वेद रहस्य त्याला तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे अवगत होते. म्हणून श्रीपादांनाही या परिषदेचे निमंत्रण देण्याचे मी ठरवले.


पण गावातल्या ब्राह्मणांची इच्छा वेगळीच होती. परिषदेतील विचार विनिमयासाठी भारी तयारी सुरु झाली होती. धर्म शास्त्रावर सूक्ष्मातिसूक्ष्म चर्चा होणार होती. श्रीपादांचे वागणे धर्म विरुद्ध आहे. त्यावर विचार विमर्श करून अप्पलराज शर्मा व बापन्नार्यांना कुलातून बाहेर काढावे. त्या निर्णयाची प्रत शंकराचार्यांना पाठवून त्यांची अनुमती घ्यावी व दोन्ही कुटुंबांना पीठिकापुरातू हाकलून लावावे, असा त्यांचा बेत होता. त्यांनी त्यांचा अंतस्थ हेतू सांगताच, मीही त्यात सामिल झालो. ब्राह्मण सभेचा अध्यक्ष होण्याची माझीही इच्छा होतीच. हे सर्व ऐकून ती इच्छा अधिकच प्रबल झाली.


श्रीपाद सर्व जातीच्या लोकांच्या कडे नेहमी जात असत. ते स्वतंत्र वृत्तीचे होते. पीठिकापुरात बंगारय्या व बंगारम्मा नावाचे चांभार जोडपे राहत असे. त्यांची श्रीपादांना भेटायची व त्यांच्याशी बोलायची फार इच्छा होती. एकदा अचानक श्रीपाद म्हणाले मला चामड्याच्याच चपला हव्या. त्यावेळी ते चौदा वर्षाचे होते. घरच्यांनी सांगून पाहिले, की ब्राह्मणांनी लाकडाच्याच खडावा वापराव्या चामड्याच्या चपला घालू नये.


ही वार्ता हळूहळू चांभार पती पत्नी पर्यंत पोहोचली. श्रीपादांना चामड्याच्या पादुका समर्पित करून धन्य व्हावे असे त्यांना वाटले. अचानक श्रीपाद त्यांच्या समोरच प्रगट झाले. दंपतीने मोठ्या प्रेमाने व आनंदाने त्यांच्या दिव्य चरणाचे माप घेतले. बंगारम्मा म्हणाल्या “महा प्रभो, माझी चामडी काढून आपल्यासाठी चपला कराव्या, अशी माझी इच्छा आहे.'' हे ऐकून श्रीपादांनी मंदस्मित केले व हसतच ते अंतर्धान पावले. आमच्याकडे एक चांगली गाय होती ती अचानक अस्वस्थ होऊन मेली. त्या गाईचे चामडे शुद्ध करून श्रीपादांसाठी चामडी पादुका करून तयार झाल्या.


यावेळी ठरल्याप्रमाणे ब्राह्मण परिषदेचे वेद पंडितांची चर्चा सुरु झाली. आदिशंकरापासून चर्चेस प्रारंभ झाला. पूर्वी काशी क्षेत्री आदिशंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात वाद सुरु झालेला होता. त्यावेळी उभय पक्षांचे म्हणणे ऐकून न्याय देणा-या मंडनमिश्रांच्या पत्नीने अट घातली होती, की शंकराचार्यांनी तिलाही चर्चेत जिंकायला हवे. शेवटी मंडनमिश्रांच्या पत्नीने आदिशंकराचार्यांना कामशास्त्रा विषयी प्रश्न विचारला. काम शास्त्रातले शंकराचार्यांचे ज्ञान शून्य होते. पण त्यांनी सहा महिन्याची मुदत मागून त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे कबूल केले. धर्माच्या विरुद्ध न जाता शास्त्रज्ञान मिळविण्यासाठी शंकराचार्यांनी नुकत्याच मरण पाव्रलेल्या एका राजाच्या शरीरात प्रवेश केला. कारण त्यांना परकाया प्रवेश विद्या अवगत होती. त्यांनी त्यांचे भौतिक शरीर त्यांच्या शिष्यांना जपून ठेवायला सांगितले.फारच आवश्यकता असल्यास राजप्रासादाजवळ येऊन सांकेतिक भाषेत अडचण कळवावी, असे ते शिष्यांना सांगून आले होते.


कुठल्यातरी महापुरुषाच्या आत्म्याने आपल्या पतीच्या शरीरात प्रवेश केला आहे. दांपत्य सुख अनुभवतांना तो दिव्यात्मा साक्षीभूत होऊन निर्विकारपणे त्या अनुभूती विषयी ज्ञान मिळवत आहे, हे महाराणीला स्पष्टपणे जाणवले. तो दिव्यात्मा आपल्या पतीच्या शरीरात असे पर्यंतच, आपला पती जीवंत राहणार हे तिला कळले. त्यामुळे तिने आदेश दिला, की “शहरात कुठेही दहन न झालेले शव असेल, तर ते ताबडतोब शोधून काढा व त्याचे लगेच दहन करा.''


शंकराचार्यांचे शरीर दग्ध करण्या आधीच, शिष्यांनी राजवेषधारी शंकराचार्यांना ही वार्ता कळवली, परंतु उशीर झालेला होता. श्री लक्ष्मी नरसिंहाच्या कृपेने शंकराचार्यांचे दग्ध झालेले हातपाय पूर्ववत झाले.


ब्राह्मण सभेत श्रीपादांचा अद्भुत संवाद


श्रीपादांनी पंडितांना प्रश्न विचारला. “आत्मा एकावेळी एकाच शरीरात राहतो. पहिले शरीर सोडल्यावरच तो दुस-या शरीरात प्रवेशतो असेच ना तुमचे म्हणणे ! मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आत्मा एकाचवेळी तीन चार शरीरात राहून तीन चार जन्माचे कर्मफळ नाहीसे करु शकतो का?''


पंडित म्हणाले, “हा मोठा जटिल विषय आहे. या आधी असे घडल्याचे काही दाखले नाहीत.''


श्रीपाद म्हणाले, “आधी असे काही घडले नाही, असे तुम्ही कसे म्हणता. देवेंद्र शापामुळे पाच पांडव रूपाने जन्मला. शची देवी द्रौपदी रूपाने जन्मली. शची पुरंदरानी भूमीवर जन्म घेतला असला तरी स्वर्गात त्यांचे मूलतत्व असणारच. द्रौपदीने शय्यासुख फक्त अर्जुनाला दिले. धर्मराजाशी ती मंत्र्याप्रमाणे सल्लामसलत करीत असे. भीमाला मातेप्रमाणे रुचकर भोजन देत असे. नकुलाजवळ लक्ष्मी रूपाने राहत होती. भूत भविष्य जाणणाच्या, अधीर स्वभावाच्या सहदेवाला पृथ्वीपेक्षाही जास्त सहनशीलतेने जपायची. अहो ! देवताधर्म वेगळे, मानवधर्म वेगळे व प्राण्यांचे धर्म वेगळे असतात. सगळ्यांची अशी गल्लत करु नये.''


त्यावर मी श्रीपादांना म्हटले, “पुराण काळात अनेक विचित्र गोष्टी घडल्या असतील. सध्या तरी तसे काही होत नाही ना?'' श्रीपादांची तीक्ष्ण दृष्टी माझ्यावर पडली. मला संबोधित ते म्हणाले. “तू तीन स्त्रियांशी विवाह केलेस. तिघीही स्वर्गस्थ झाल्या. त्या तिघींचे तीन आत्मे आहे का? की एकच आत्मा? पुरुषाने तीन स्त्रियांशी विवाह करणे धर्म सम्मत असल्यास स्त्रीनेही तीन पुरुषांशी विवाह करणे धर्म सम्मत आहे का? खरे तर आत्मा म्हणजे काय? दांपत्यधर्म म्हणजे काय?


त्यावर मी म्हणालो, “पुरुषाने कितीही स्त्रियांशी लग्न केले तर चालते पण स्त्रीला तसा हक्क नाही.''


श्रीपाद म्हणाले, “अहो ! त्या जगन्नियंत्या पेक्षा तुम्ही थोर आहात का? मंदोदरी पतिव्रता होती. ती वालीची पत्नी असताना तिचे शरीरअणू वेगळे होते. रावणपत्नी असतांना तिचे शरीरअणू वेगळे होते व बिभीषणाची पत्नी असतांना तिचे शरीरअणू वेगळे होते. आत्मा निर्विकार व निःस्संग असल्यामुळे तो नित्य युक्त व शुद्ध आहे. अत्यंत पवित्र आहे. तमोगुण प्रधान असलेल्या वालीची पत्नी असतांना, ती त्या अनुसार वागते. रजोगुण प्रधान असलेल्या रावणाची पत्नी असतांना ती त्यानुसार व्यवहार करते व सत्वगुण प्रधान असलेल्या बिभीषणाची पत्नी असतांना तसे कर्तव्य पार पाडते ना?"


मी निरुत्तर झालो, काही वेळाने विचार करून बोललो. “श्रीपादा, तू सांगितलेले मान्य केल्यास बहभर्तृत्व मान्य करावे लागेल.'' श्रीपाद म्हणाले, “हे कलियुग आहे. अनेक अवांतर जाती आविर्भूत होत आहेत. पशु पक्षादि, वृक्ष, कृमी, कीटक यांच्या सह मानव जन्म घेत आहे. ते आपल्याला स्वभावाप्रमाणे अनेक प्रकारच्या नात्याने जगत आहेत. धर्माच्या विरुद्ध नाते संबंध असल्यास अवांतर कुल होत आहेत. कलियुगांतांत हे नाश होणारच. ही अवांतर कुले निर्माण व्हायला असुर शक्तीच कारणीभूत आहे. त्यामुळे असुरध्वंसन करावे लागेल. एकदा असुर मारला गेला की, पुन्हा जन्म घेऊ शकत नाही. पण एका असुराच्या जागी दहा असुर निर्माण होतात. नातेसंबंध, धर्मबद्ध असेल तर तो टिकून राहतो. त्यामुळे सगळ्यांनी बरोबर कुलगोत्र व वर्णाश्रम धर्माचे पालन करावे.


काही दिव्यात्मे पण प्रकट होत असतात. त्यांचा एकच आत्मा असतो. पुरुषरूपात आत्मा प्रकट झाला की स्त्री रूपात त्याची शक्ती प्रकट होते. त्यांना दिव्य दामप्त्य म्हटले जाते. दिव्यात्मा सृष्टीच्या आदी पासून आहे व तो सृष्टी अंतापर्यंत असेल, पराशक्ती परब्रह्माच्या अद्वितीय स्वरूपात सायुज्य स्थितीत तो दिव्यात्मा राहिल.


तू वेदांत शर्मा नावाच्या ब्राह्मण रूपाने व बंगारय्या नावाच्या चांभाराच्या रूपाने एकाच वेळी जन्मलास. तुझी स्त्री शक्ती तुझ्या तीन पत्नींच्या रूपात तुझ्या घरची नुकतीच जी गाय मेली, त्या गोमातेच्या रूपात व बंगारय्या नावाच्या चांभाराच्या पत्नी रूपात म्हणजे बंगारम्माच्या रूपात एकाच काळात जन्मली. तुझ्या मरण पावलेल्या तीन पत्नींचे चैतन्य व गोमातेचे चैतन्य सध्या बंगारम्मा नावाच्या चांभार स्त्रीमध्ये एकवटले आहे. चैतन्य जेथून आले त्या आपल्या मूळ चैतन्यातच मिळणार. सृष्टी रहस्य मोठे गहन आहे. ते जाणण्याची शक्ती सप्तर्षीमध्येही नाही. बंगारम्माचे शरीर बंगारय्याला दान केल्यामुळे हे धर्म विरुद्ध न होता, तू तिच्याशी संसार करावा. पण तिच्यापासून शरीर सुख घेऊ नये. आजच्या या ब्राह्मण परिषदेत भरलेल्या या विद्धत्सभेत ज्याला धर्मस्थान म्हणतात, इथे मी हा निर्णय देत आहे. या सृष्टीत राहतांना प्रकृती धर्म, मर्यादा विधीपूर्वक पाळायलाच हव्यात. बंगारम्मा मला म्हणाली होती की, तिच्या चामड्याच्या पादुका ती माझ्यासाठी करणार होती. मी हसून संमती दिली होती. ती बंगारम्मा असतांनाच तिच्या नकळत ती गोमाताही होती. त्यामुळे तिच्या चामड्याच्या पादुका तयार झाल्या. बंगारम्माच्या नकळतच, ती तुझ्या तीन पत्नीच्या रूपात ही होती. चैतन्य तीन चार शरीरात विभाजित असले तरी प्रत्येक शरीराचे चैतन्य स्वतःला, मी म्हणून वेगळे समजत असते. त्यातले एकत्व ओळखू शकत नाही. “कलै पंच सहस्राणि जायते वर्ण संकरः'' याचा अर्थ हाच. त्यांनी कुलसंकर म्हटले नाही, वर्ण संकर म्हटले आहे. कुलसंकर झाल्यास नीच जन्मात जावे लागते. वर्ण संकर झाल्यास नूतन शक्तियुक्त नवीन जात उद्भवते. ही नवीन जात क्रम विकासात दैवत्वात मिळते. या भूमीवर अशा दैविक जातीचा उद्भव व्हायचा आहे.


या ब्राह्मण सभेचा अंतस्थ हेतू मला ज्ञात आहे. माझ्या आजोबांना, माझ्या वडीलांना कुल बहिष्कृत करावे असा वाईट संकल्प तुमच्या अंतरंगात लपून आहे. म्हणून मी वेदांत शर्मा नावाने तुला कुल बहिष्कृत करीत आहे. आजपासून तू व्यवहारात बंगारय्या नावाने वावरशील'' अशी त्यांनी आज्ञा केली.


सर्व ब्राह्मणसभा दिग्मुढ झाली. सगळ्यांच्या समक्ष एक ज्योत माझ्यात मिसळली. त्यावर पुन्हा श्रीपाद म्हणाले, “आता हा ब्राह्मण की चांडाल? हे तुम्हीच ठरवा. आम्हाला कुल बहिष्कृत करून शंकराचार्यांची अनुमती घेण्याच्या प्रयत्नात तुम्ही होता. शंकराचार्य माझे काय करणार? तुमच्या नजरेसमोरच मी इथे जन्मलो मोठा झालो. आजोबा व बाबांजवळ वेद न शिकताच, मी वेद, ऋचा म्हणू शकतो. एकाचवेळी अनेक ठिकाणी दर्शन देतो, स्वतः शंकराचार्य जरी इथे आले, तरी मला त्याचे काय? त्यांचे जे नित्य आराध्य दैवत श्री शारदा चंद्रमौळीश्वर, यांचे त्यांना दर्शन घडवून अनुग्रह देईल, तेव्हा तेच माझे देवत्व मान्य करतील. मात्र नंतर ते जे निर्णय देतील ते तुम्हालाच हानीकारक ठरणार. क्षत्रिय परिषद, वैश्य परिषदही तुमचा निर्णय मान्य करणार नाही. त्यांच्याकडचे तुमचे पौरोहित्य, कर्मकांड, संभावना त्यांनी थांबवल्या, तर तुम्ही तुमच्या कुटुंबासह उपाशी मराल. माझ्याशी लढाल तर सर्वनाश विकत घेण्यासारखे आहे. मीच चतुराश्रम धर्माचे पालन करणारा आहे. इथल्या अठरापगड जातींनी गुण्या गोविंदाने सुख संतोषाने जगावे. तुम्ही धर्म कर्माचे निष्ठेने पालन करून या धर्मस्थापन कार्याचे भागीदार व्हा. तसे केले नाही तर कष्ट दशेस पात्र व्हाल. मी शांतच राहिल, तुम्हीच उध्वस्त व्हाल.


प्रकृतीत दोन पद्धतीने कार्य होत असते. एक सहजतेने, दुसरे बळजबरीने. सहजपणे होण्यास जरा वेळ लागतो. बळजबरीला सहमत नसाल तर तुम्ही विनाशाला आमंत्रण देत आहात असे समजा. वेळ पडली तर मी विनाश करून धर्मस्थापना करीन.'' अत्यंत निष्ठुरपणे श्रीपादांनी सर्वांची कान उघडणी केली.


मी विधीलिखित समजून गत्यंतर नसल्यामुळे बंगारम्माला घेऊन या गावातून त्या गावात जात जात या ठिकाणी पोहोचलो. या आश्रमात मी मातंगी देवीची प्रतिष्ठापना केली व तिची आराधना करीत जगत आहे.


एकदा श्रीपाद या मार्गाने कुरवपुरला जात होते. त्यांनी आश्रमात येऊन आम्हाला आशीर्वाद दिला व म्हणाले, “शरीर पतनानंतर तू पुन्हा पूर्वसंचिता प्रमाणे ब्राह्मण जन्म घेशील. बंगारम्मा शूद्र जन्म घेईल. तेंव्हा तुम्ही पती-पत्नी व्हाल, तुम्हाला जे संतान होईल, त्या संतानाला कुरवपुरमध्ये माझी पूजा अर्चना करण्याचे भाग्य प्राप्त होईल. तुम्ही सुखी असा!''


असा हा आमचा एकंदर वृत्तांत असून श्रीपादांशी आमचा जो अनुबंध जुळला, त्या विषयीचे वर्णन तुम्हाला सांगितले आहे. तसेच त्यांचा हाही आदेश होता की शंकरभट्ट व धर्मगुप्त इकडून जातील तेंव्हा त्यांचे आदरातिथ्य करून, त्यांच्याकडचे पैंजण घेऊन त्यांना या चामडी पादुका (चर्मपादुका) द्या.''


आम्ही आराधना करतो ती देवी मतंग मुनींची कन्या मातंगी देवी होय. या देवीच्या आराधनेने विशेष दांपत्य सुख लाभते. हिला राजमातंगी, कर्णमातंगी असेही म्हणतात. एकदा श्रीपादांनी आमच्या आश्रमात आम्हाला साक्षात् दर्शन दिले. त्यावेळी बंगारम्मा दूध गरम करत होती. जिच्या चर्मापासून या चर्म पादुका बनल्या होत्या त्या पादुका आपल्या डोक्यावर मिरवीत ती गोमाता आमच्या समोरून जात आहे, असे तिचे दर्शन घडले. श्रीपादांनी आमच्या घरचे दूध स्वीकारले. आमच्या घरची देवघरातील मातंगी देवीची मूर्ती त्यांच्या नावाने होणाच्या महासंस्थानाच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली बरीच खोल अशी राहिल व अनेक सिद्ध पुरुषांची सेवा घेईल, असेही त्यांनी सांगितले.


बंगारम्माला बोलावून ते म्हणाले, “माते तुझा नवरा फार मोठा थोर माणूस आहे. पुढच्या जन्मात तुला याच्याकडून सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्यासाठी मी सोन्याची बिंदी करून ठेवली आहे. शुभप्रद असे मंगळसूत्र पण करून ठेवले आहे. ते हिरण्यलोकात जपून ठेवले आहे. पुढच्या जन्मात मीच स्वतः तुझ्यावर अनुग्रह करून तुमचा विवाह लावून देईन.”


अहो! तुम्ही आमची गाथा ऐकली ना? तुम्ही नेहमी सिद्ध मंगल स्तोत्र म्हणत राहा. तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह नक्की लाभेल. सिद्ध, महासिद्ध, महायोगी हे सर्व श्रीपादांच्या करचरण द्वयासारखे आहेत. त्यांच्याच करवी श्रीपाद त्यांचे संकल्प पूर्ण करून घेतात. एकदा त्यांनी राज मातंगी देवी स्वरूपात दर्शन दिले व अनुग्रहीत केले. समस्त सृष्टीतील सर्व रहस्ये त्यांच्या हातात आहेत. तुम्ही सतत त्यांचे स्मरण करीत जा. त्यांचे ध्यान व अर्चना करा. सर्व सिद्ध तेच. ते जन्मदात्या आईसारखे आपले रक्षण करतात. कोटी मातृत्वापेक्षा श्रीपादांचे प्रेम श्रेष्ठ असून, ते सतत भक्तांवर त्यांचा वर्षाव करीत असतात.


॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥