॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय - १८
रविदासांचे वर्णन - श्रीपादांचे दिव्यमंगल दर्शन
मी ब्राह्मण बंधू सहित कुरवपुरला पोहोचलो. अनंत कोटी ब्रह्मांडनायक आदिपुरुष, आदिमध्यांत रहित, चतुर्दश भुवनाचे सार्वभौम लीलावतार, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी कृष्णानदीत स्नान करून तीरावर येत होते. त्यांच्या दिव्यमंगल मुखमंडलावर दिव्य तेज झळकत होते. त्यांच्या दृष्टीतून अपार प्रेमाचे व करुणेचे सिंचन होत होते. ते माझ्याजवळ आले व त्यांनी, मला पदस्पर्श करून नमस्कार करायला सांगितला. मी त्यांना चरणस्पर्श करून नमस्कार करीत असतांनाच, त्यांनी आपल्या कमंडलूतील पवित्र उदक माझ्या डोक्यावर शिंपडले. मी काहीच बोललो नाही. श्रीपाद आपल्या मधुर वाणीने म्हणाले, “बेटा ! शंकर भट्टा ! माझ्यावरच्या प्रेमाने तुला इथे आकर्षित केले. त्या वचनातील माधुर्याचे व त्यांच्या अपार करुणामृत दृष्टीचे वर्णन करण्यास शब्दच नाहीत. समस्त भुवनाला अभय प्रदान करणारे, अपार शक्तिसंपन्न असे त्यांचे दिव्य हस्त, त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवले. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली. माझ्या समोरचे विश्व अदृश्य झाल्यासारखे वाटले. हजारो समुद्र उचंबळून मला त्यात समावून घेत आहेत असे वाटले. माझे मन निर्विकार, निश्चल होऊन शून्यात गेले. माझ्या हृदयातील चैतन्य, विश्वातील अनंत चैतन्यात मिसळले. एकेकदा अत्यंत तरल अशा आनंदमय स्थितीतील माझे अस्तित्वही मला कळत होते. कधी “मी' पण शांत होऊन अव्यक्त दिव्यानंद स्थितीत असायचो. त्या स्थितीत अनंत कोटी ब्रह्मांडाची सृष्टी-स्थितीलय होत असल्याचे ज्ञान होत असताना “मी” या सर्व चैतन्यापासून अभिन्न आहे असे जाणवायचे. हा “मी” नाहीसा झाल्याने अव्यक्त दिव्यानंदात होतो, हे सगळेच विचित्र वाटू लागले. तेव्हा श्रीपादांनी प्रेमाने पुन्हा आपल्या कमंडलूतील उदक प्रोक्षण केले. त्यामुळे मी माझ्या नेहमीच्या स्थितीत आलो. जगाचे आदिगुरु श्रीपाद श्रीवल्लभ,अत्यंत प्रेमळ दृष्टीने व करुणामय कृपेने माझ्याकडे बघत मंदहास्य करीत होते.
म्लेंच्छांना श्रींचे दर्शन
माझ्या सोबत आलेल्या ब्राह्मण बंधूना श्रीपादांशी बोलण्याची किंवा त्यांच्या चरणांना स्पर्श करण्याची हिंमत होत नव्हती. श्रीपादांनी माझ्याकडे बघत “हे दोघे कोण?'' असे विचारले. मी सांगितले, “प्रभू ! आपल्या दिव्य चरण दर्शनासाठी आलेले हे दोघे ब्राह्मण बंधू आहेत.''
“बेटा ! हे ब्राह्मण वाटत नाहीत. गोमांस खाणारे म्लेंच्छ वाटतात. खरे काय ते त्यांनाच विचारल्याने कळेल.'' तेंव्हा दोघेही भाऊ म्हणाले “अहो ! आम्ही ब्राह्मण नाही. म्लेंच्छच आहोत. यात संशय नाही' असे म्हणून ते कलमा पढू लागले. श्रीवल्लभ क्षणोक्षणी विहार करतात. मी हे बघून दिग्मूढच झालो. तेंव्हा महागुरु म्हणाले, “श्रीपाद श्रीवल्लभ नावाने, मायावेषात संचार करणाच्या जगत् प्रभू श्री दत्तात्रेयांना ओळखण्यासाठी अनेक जन्माचे पुण्य लागते. गायीत सर्व देवता असतात. म्हणून अशा पवित्र गायीविना घर, म्हणजे स्मशानच! जे श्रद्धेने गोसेवा करतात ते मला फार आवडतात. गोक्षीर पुष्टिप्रद तुष्टिप्रद ! त्यामुळे ब्राह्मण जन्माला येऊन, गोमांस भक्षण करणारा शिक्षेस पात्र ठरतो. यज्ञात, अज बळी देतात. यज्ञपशू झालेला तो अजच नव्हे, तर त्याच्या वंशातील सर्वच त्या निम्नश्रेणीच्या जन्मातून विमुक्त होऊन उत्तम गतीस प्राप्त होतात. यज्ञ पशूला उत्तमगती देण्याचे सामर्थ्य मात्र, योगबल व तपोबल असलेल्या यज्ञकर्त्यालाच असते. योगबल, तपोबल नसलेल्याने नाममात्र यज्ञ करून अज बळी दिल्यास, त्या अजाला मारल्याचे पातक लागते. त्या त्या देशकालाप्रमाणे धर्म कर्म बदलत असतात. म्लेंच्छ असूनही तो चांगला साधक असेल, तर त्याला गोमांस भक्षणाचे पाप लागत नाही. उलट परमेश्वरार्पण बुद्धीने केलेल्या या कर्माने त्या गोवंशाचाही उद्धारच होतो. मात्र तसे नसेल तर महापाप लागेल. म्हणूनच साधारण नियमाप्रमाणे गोवध हे महापाप ठरविले आहे. | कौरवपांडव युद्धासाठी योग्य धर्मक्षेत्र शोधण्यासाठी, अर्जुनाच्या सोबत श्रीकृष्ण फिरत होते. एका जागी एक शेतकरी पाण्याचा प्रवाह अडवण्यासाठी दगड शोधीत असताना शेतक-याचा मुलगा, त्याच्यासाठी जेवण घेऊन आला. शेतक-याने मुलाचे डोके कापून, ते डोके प्रवाहात ठेऊन पाणी अडवले. शिर कापणारा बाप किंवा तो मुलगा, ही क्रिया घडत असतांना कुठल्याही भावोद्वेगात नव्हते. दोघेही निर्विकार होते. समाजाच्या क्षेमासाठी अन्न धान्य पिकविणे हे त्या शेतक-याचा धर्म. पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले असते. त्यामुळे निरपेक्षपणे त्याने आपले कर्तव्य केले. हे पाहून श्रीकृष्णानी युद्धासाठी ती जागा धर्मक्षेत्र म्हणून निश्चित केली.
तेंव्हा हे नाममात्र ब्राह्मणांनो ! गोमांस भक्षण तुम्हाला समर्थनीय नाही. तुमच्या पूर्व पुण्याईने तसेच तुमच्या पितरांच्या प्रार्थनेमुळे व माझ्या अव्याज करुणेमुळे तुम्हाला माझ्या दर्शनाचे भाग्य लाभले. हे तुमच्या अपूर्व नशीबाचे फळ समजा. तुमचे नमस्कार मी स्वीकारणार नाही. माझ्या पायाला तुम्ही स्पर्श करु नका. माझ्या कमंडलूतील पवित्र जलही मी तुमच्यावर शिंपडणे शक्य नाही. आता तुम्ही इथून निघून जा. तुम्हाला अन्न पाणी वस्त्राची उणीव राहणार नाही, एवढे मात्र मी सांगतो. तुम्ही म्लेंच्छ वनितांशी विवाह करून म्लेंच्छ धर्माचे पालन करा. या जन्मात तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी, जन्मोजन्मी तुमच्या संतान रूपाने जन्माला येतील. तुमचा अनेक प्रकारे छळ करून, तुम्ही कष्टाने मिळवलेल्या धनाचा, यथेच्छ उपभोग घेत सुखाने जगतील. माझ्या दर्शन भाग्याने तुम्ही काही शतकानंतर बडेबाबा, अब्दुलबाबा या नावाने प्रसिद्ध व्हाल. माझा संपूर्ण सद्गुरु अवतार म्हणजे साईबाबा. महाराष्ट्रात शीलधी (शिर्डी) येथे मी अवतरणार. त्या अवतारात तुमचा उद्धार होईल..तिथेच तुम्हाला ते भेटतील. माझी आज्ञा अनुल्लंघनीय असते ही दगडावरची रेघ कुणीही मिटवू शकत नाही. तेव्हा आता तुम्ही निघा' अशी त्या दोघांना श्रीपादांनी आज्ञा केली.
मी व श्रीपाद असे दोघेच बसलो होतो. इतक्यात रविदास नावाचा रजक(धोबी) तिथे आला. रविदास श्रीपादांना वारंवार नमस्कार करीत होता. असे काही क्षण श्रीपादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर मात्र मंदहास्य करीत त्याच्याकडे बघितले. हे असे का? असा मी विचार करीत होतो, तर हसत करुणा दृष्टीने माझ्याकडे बघत श्रीपादांनी माझ्या भ्रूमध्यात दाबले. अद्भुत ! तत्क्षणी माझ्या अंतश्चक्षूना पुढील दृश्य दिसू लागले.
भक्तांना श्रीपादांचा अनुग्रह
कुरवपुरमधे रविदास कृष्णा नदीवर नाव चालवत असे. एक दिवस त्या नावेत बसायला एक वेदसंपन्न पंडित आला. त्याला कुरवपुरला जायचे होते परंतु तो ब्राह्मण असल्यामुळे नावेत तो इतरांना बसू द्यायला तयार नव्हता. त्याला एकट्यालाच नेले तर जास्त पैसे लागतील असे रविदास म्हणाला. तेव्हा तो पंडित म्हणाला, “मी श्रीपादांना भेटायला चाललो आहे. माझी विद्वत्ता ओळखून ते मला संभावना देतीलच. त्या धनातून मी तुझ्या नावेचे भाडे देईन.
रविदास “ठीक आहे म्हणाला. नाव नदीतून चालली होती. परस्परात बोलणे सुरु झाले. पंडिताला जेंव्हा कळले की, रविदासाला इतिहास पुराणाबद्दल काहीच माहीत नाही. तेव्हा पंडित त्याला म्हणाला, “अरे! मी वेदशास्त्र संपन्न असल्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे. तुला मात्र हे ज्ञान नसल्यामुळे तुझे अर्धे जीवन व्यर्थ झाले आहे. रविदास त्यावर काहीच न बोलता नाव चालवत होता. नदीला पाणी भरपूर होते नावेला अचानक छिद्र पडले व त्यातून पाणी आंत येऊ लागले. रविदासाने त्या पंडिताला विचारले, “अहो तुम्हाला पोहता येते का?'' पंडित म्हणाला, “नाही'' तेंव्हा रविदास म्हणाला, “मला पोहता येते. त्यामुळे माझा जीव वाचू शकतो, पण तुम्हाला पोहता येत नसल्यामुळे तुमचे पूर्ण जीवनच व्यर्थ ठरणार आहे.''
श्रीपादांचे नामस्मरण करीत रविदास नदीत उडी मारणारच होता, इतक्यात त्याला डोळे दिपवणारे तेज जाणवले. पाणी आत येत होते, पण एक दिव्य हात अदृश्यरूपाने ते | पाणी बाहेर फेकीत होता. हा सर्व श्रीपादांचा महिमा आहे, हे रविदासाने ओळखले. नाव सुखरूपपणे तीराला लागली. दोघेही श्रीपादांच्या दर्शनाला आले. रविदासाने नमस्कार | केला की, श्रीपाद बरेचदा दुर्लक्ष करीत पण यावेळी मात्र त्यांनी हसून प्रसन्नपणे रविदासाकडे पाहिले. पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले.
शास्त्र चर्चा करण्याच्या विचाराने आलेल्या पंडिताच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. श्रीपाद म्हणाले, “अरे विद्वत्तेच्या गर्वाने मदोन्मत झाला आहेस. सवंशात जन्मलास, मोठा पंडित झालास. पण योग्य काय अयोग्य काय याचा तुला विवेक राहिला नाही. पुण्य कमावण्याऐवजी पापाचे गाठोडे बांधत आहेस. पत्नीला छळतोस. सुखाने संसार करणाच्या एका रजकाच्या पत्नीला फसवलेस. तिच्या नवच्या पासून दूर करून तिला तू आपली रखेल बनवलीस. ती हतबल झाली. तिला गत्यंतर नसल्यामुळे तिने आपले शरीर | जरी तुझ्या हवाली केले असले, तरी ती नेहमी तुला शापच देत असते. तुझ्या पत्नीचा संसार उध्वस्त झाल्यामुळे तिलाही मानसिक त्रास होतो. हे सगळे मला दिसत आहे. म्हणूनच तुला इथे बोलावून घेतले. खरे तर आज तुला मृत्यु योग आहे. पण मी तुला अजून तीन वर्षाचे आयुष्य प्रदान करीत आहे. तू घरी जाऊन तुझी ही दुराचारी वृत्ती बदल, नाही तर तू आणि तुझे कर्म ! तू विद्वान पंडित आहेस यात संशय नाही. आता सांग तुला तुझ्या विद्वत्तेची संभावना (दक्षिणा) देऊ की तीन वर्षाचे आयुष्य देऊ? पटकन उत्तर दे!
सर्वज्ञ श्रीपादांचे वचन ऐकून पंडित गप्प बसला. त्याच्या मनात त्याचे आयुष्य वाढावे अशी इच्छा होती. पण त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. तेंव्हा श्रीपादच बोलू लागले. “तुझ्या इच्छेप्रमाणे तुझे आयुष्य वाढवतो. तुझी रखेल पुढच्या जन्मी तुझी पत्नी होणार होती, पण या जन्मातच तू तिला जवळ केलेस. त्या जन्माचे धर्म त्या जन्मापुरतेच मर्यादित असतात. तू या नियमाचे उल्लंघन केलेस. पुढच्या जन्मी ते रजक जोडपे राजैश्वर्य भोगतील. तू नपुंसक होऊन त्या रजक वनितेची सेवा करीत आपले कर्मफल भोगशील. या दिलेल्या तीन वर्षांच्या आयुष्यात सत्कर्म केलेस तर तुला अन्नवस्त्राची कमी पडणार नाही. पण दुष्कर्माचे आचरण केल्यास रजक दंपतीची सेवा करताना, तुला तुझ्या मेहनतीचे योग्य पैसे न मिळाल्यामुळे कष्टात जगशील. तुझा मृत्युयोग टळून या रविदासाने तुला येथवर माझ्या दर्शनासाठी आणले. त्याला तुझे समस्त पुण्य मिळेल. त्या पुण्य फलामुळे साक्षात् दत्तावतार असलेल्या माझी तो सेवा करील. आता तूशक्यतो लवकर, ही माझी पुण्यभूमी सोडून जा.''
तो पंडित निघून गेला. रविदास श्रीपादांची सेवा करू लागला. तो रोज श्रीपादांचे कपडे धूत असे, आश्रमाचे प्रांगण झाडून स्वच्छ ठेवीत असे. श्रीपाद नदीवर स्नानासाठी | गेले असता रविदास त्यांना साष्टांगप्रणिपात करायचा. श्रीपादही प्रसन्न वदनाने त्याचा नमस्कार स्वीकारीत असत. अशा वेळी रविदासाला त्याच्या वडीलांनी तिरुमलदासांनी सांगितलेले आठवत असे. श्रीपादांना नमस्कार केला तर नमस्कार करणा-याला अनेक लोकांनी नमस्कार केल्याचे भाग्य लाभते. कारण ते सर्वांतर्यामी आहेत. त्यामुळे श्रीपादांनी नमस्कार स्वीकारला की रविदासाला अपार आनंद होत असे.
रविदासाने एकदा नदीवर एका राजाला सुंदर युवतीबरोबर जलक्रीडा करताना बघितले. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की आपल्यालाही असे राजवैभव उपभोगायला मिळाले तर किती छान होईल. श्रीपाद नदीवर स्नानाला निघाले असता रविदासाने आपली ही इच्छा श्रीपादांजवळ व्यक्त केली, तेव्हा श्रीपादांनी त्याला वरदान दिले. “ठीक आहे तू विदूरानगरीत यवनवंशात जन्म घेशील. नरसिंह सरस्वती अवतारात तुला माझ्या दर्शनाचे भाग्य लाभेल.'' असे अभय वरदान देऊन श्रीपाद रविदासाकडे पहात हसू लागले. तेव्हा रविदास तिथल्यातिथे मृत्यू पावला. माझ्या अंतश्चक्षूने हे सर्व विचित्रदृश्य बघितल्यामुळे मी संभ्रमित होऊन आश्चर्यचकित झालो. मी भानावर येताच श्रीपाद माझ्याकडे पाहून हसत होते. श्रीपादांच्या क्षणोक्षणी घडणा-या अशा नित्य लीलांविषयी काय सांगणार?
इतक्यात श्रीपादांच्या दर्शनाला येणा-या आर्त भक्तांची रीघ लागली. काही स्त्रिया आपल्या आजारी पतींना घेऊन आल्या होत्या. काही मुलींचे आई वडील मुलीला योग्य स्थळ मिळावे या इच्छेने आले होते. त्या सर्वांना श्रीपाद हळकुंडाचा प्रसाद देत होते तो घेऊन प्रत्येक जण मंदहास्य करीत निघून जात होते.
वल्लभेषाला श्रीपादांचा अक्षय्यपात्र अनुग्रह
इतक्यात एक ब्राह्मण युवक तेथे आला. तो पीठिकापुरहून आला होता. तो धुळीने माखलेला होता. त्याचे गोत्र काश्यप व आपस्तंभ सूत्र होते. त्याचे नाव वल्लभेश्वर होते. श्रीपादांनी पीठिकापूर मधील आपल्या आप्त जणांची प्रत्येकाचे नाव घेऊन त्याच्याजवळ आस्थेने विचारपूस केली सर्वज्ञ असूनही हा सारा लौकिक व्यवहार ते सांभाळत. दुपारच्या भिक्षेसाठी अनेकांनी खाद्यपदार्थ आणले होते. इतक्यात श्रीपादांनी हात वर केला तर त्यांच्या हातात खिरीने (पायसम्) भरलेले चांदीचे पात्रं आले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना तो खिरीचा प्रसाद वाटण्यास श्रीपादांनी मला सांगितले. इतक्या लोकांना प्रसाद देऊन सुद्धा खिरीचे पात्र भरलेलेच राहिले. शिष्यांनी आणलेले खाद्यपदार्थ कृष्णानदीत समर्पण करण्याचे कार्य त्यांनी रविदासावर सोपवले. अशा प्रकारे नदीतील जलचरांना पण प्रसादाचे वितरण केले गेले.
श्रीपादांनी वल्लभेषाला आपल्या जवळ बसायला सांगितले. त्यांच्या बाजूलाच मी बसलो. माझ्या बाजुला सुब्बण्णाशास्त्री नावाचा कानडी ब्राह्मण बसला होता. इतक्यात तिथे एक गरीब ब्राह्मण आला व आपल्या मुलीसाठी चांगले स्थळ सांगावे, अशी श्रीपादांना प्रार्थना करू लागला. तेव्हा श्रीपाद म्हणाले, “मी असताना तुम्हाला भीती कसली. जिथे पाप असते तिथेच भीती असते. हा वल्लभेषच तुझा जावई. तुझ्या मुलीच्या लग्नाचे पौरोहित्य सुब्बण्णाशास्त्री करतील वल्लभेषाचे पितर फार रागावले आहेत. पितृ देवतांचे शाप चांगले नसतात. श्रद्धेने व सद्भक्तीने पितराचे श्राद्धदि कर्मे केली तरच केलेले पिंडदान त्यांना पोहोचते. एरवी पोहोचत नाही. म्हणून यांच्या लग्नाच्या वेळी प्रथम गरुडपुराणातील मंत्र म्हणून नंतर विवाह मंत्र म्हणावे. मंगल सौभाग्यासाठी हे हळकुंड घ्या.
आज तुम्हाला दिलेला खिरीचा प्रसाद मोठा दुर्लभ आहे. पीठिकापुरात मल्लादि, वेंकटप्पण्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा मला खिरीचाच नैवेद्य दाखवायचे. तीच खीर मी तुम्हाला वार्टली. ब्रह्मराक्षस, महापिशाच्च वगैरे दुष्ट शक्तींची ज्यांना बाधा झाली आहे, त्या लोकांची बाधा या प्रसादाने नाहीशी होईल. दारिद्र्याने पीडलेल्या लोकांना वाढत्या ऐश्वर्याची प्राप्ती होईल." हे सांगतांना श्रीपादांना गहिवरून आले व त्यांच्या गालावरून अश्रू वाहू लागले. दाटलेल्या कंठाने श्रीपाद म्हणाले “मल्लादि, वेंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंह वर्मा या वंशाशी माझे ऋणानुबंध कालातीत आहेत. त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी परावश होतो. लहानपणी मी त्यांच्या स्वयंपाक घरात काही तरी खायला मिळेल म्हणून मनमोकळेपणाने फिरत असे. तेच नाही तर दुस-या कुणीही माझी वत्सल भक्तीने आराधना केली तर त्यांच्याही घरात मी बालक रूपाने फिरत असतो. माझ्या पावलांचा ध्वनी त्यांच्या हृदयात सदा प्रतिध्वनित होत राहतो.
रात्री कुरवपुरमध्ये माझ्या अनुमती शिवाय कुणीही राहू नये, कारण मुक्ती मिळावी म्हणून इथे ब्रह्मराक्षस, महापिशाच्च आर्ततेने आक्रंदन करीत असतात. मी त्यांना गिळून टाकतो व त्यांना सव्य (उत्तम) विमुक्त देह रूपाने देत असतो. देवता, गंधर्व, यक्ष वगैरे उच्च श्रेणीचे लोक माझ्या दर्शन भाग्यासाठी इथे येत असतात. तसेच महासिद्ध, योगी, अनेक शतके तप समाधीत असलेले महापुरुष माझ्या दर्शनासाठी, स्पर्शासाठी, संभाषणासाठी आतुर असतात. आता तुम्ही नदी ओलांडून पैलतीरावरच्या गावात जा. माझी आज्ञा अनुल्लंघनीय आहे.'
आज्ञेप्रमाणे आम्ही नदी ओलांडून नदी काठच्या गावी पोहोचलो. गरीब ब्राह्मणाच्या घरी लग्नाची तयारी झाली होती. वधूपित्याने वर वधूला एका आसनावर बसवले होते. पुरोहिताच्या स्थानी (ब्रह्मस्थान) सुब्बण्णाशास्त्री बसले होते. त्यांना गरुडपुराणातील मंत्र माहीत नव्हते. विवाह समयी वधूवरासमोर तसले मंत्र म्हटलेले त्यांनी कधी ऐकले किंवा पाहिले नव्हते. पण श्रीपादांचे ध्यान करून त्या स्थानी बसताच त्यांच्या मुखातून नकळत ते मंत्रोच्चार निघू लागले. त्यांना स्वतःलाही आश्चर्य वाटले. तो विधी आटोपल्यानंतर त्यांनी विवाह मंत्र पठण करून विवाहविधी संपवला. कन्येचा पिता निर्धन होता. विवाहासाठी आलेले आप्त जन विवाह पारंपारिक सापँदाय पद्धतीने झाला नाही म्हणून रागावून | निघून गेले. वल्लभेषाचे आईवडील नव्हतेच. त्यामुळे कन्येचे आई वडील वरवधू सुब्बण्णा शास्त्री व मी इतकेच लोक होतो. त्यानंतर नवीन जोडप्याला घेऊन आम्ही श्रीपादांच्या दर्शनाला गेलो. स्वामींनी सर्वांना आशीर्वाद देऊन खूश केले. सगळ्यांना त्यांनी त्यांच्या सान्निध्यात ध्यानस्थ बसायला सांगितले. मी ध्यानस्थ होताच मला वल्लभेषाचे भविष्य दिसू लागले..
वल्लभेष हळदीचा व्यापारी होता. व्यापारात लाभ झाल्यास कुरवपुरमध्ये सहस्त्र ब्राह्मणांना भोजन द्यायचे ठरवले होते. श्रीपादांच्या कृपेने त्याला बरेच धन मिळाले. पण कबूल केल्याप्रमाणे करावयाचा ब्राह्मण भोजनाचा बेत पुढे ढकलला जात होता. तितक्यात श्रीपाद ही कुरवपुरमध्ये अदृश्य होऊन गुप्त रूपात होते. कुरवपुरमध्ये श्रीपादांच्या पादुका मात्र होत्या. वल्लभेष पैसे घेऊन कुरवपुरला येत असताना त्याला चार यात्रिक भेटले. त्याला सोबत केल्यासारखे दाखवत ते त्याच्याबरोबर येत होते. पण ते चोर होते. वेळ साधून त्यांनी वल्लभेषाचा मस्तक कापून वध केला. त्यावेळी वल्लभेष श्रीपादांचे नामस्मरण करीत होता. त्रिशूलधारी श्रीपादांनी यति वेषात येऊन चौघापैकी तिघांना ठार मारले. चौथा श्रीपादांची क्षमा मागून प्रार्थना करीत होता. “मी चोर नाही कधी चोरी केली नाही. हे तिघे मला वाटसरू सारखे भेटले. त्यांच्या सोबतीने प्रवास करीत होतो. माझे रक्षण करा.'' दयामूर्ती श्रीपादांनी त्याला अभय दिले. नंतर श्रीपाद त्या माणसाला म्हणाले “मी देतो ती विभूती या वल्लभेषाच्या शरीरावर शिंपड व त्याचे मस्तक त्याच्या धडाला चिकटव.'' श्रीपादांच्या अमृत दृष्टीमुळे वल्लभेष जीवंत होऊन उभा राहिला. पण तोवर श्रीपाद अंतर्धान झाले होते. ती सगळी हकीकत त्या चौथ्या चोराने वल्लभेषाला सांगितली. श्रीपादांचे | दर्शन झाले नाही म्हणून वल्लभेषाला फार वाईट वाटले. वल्लभेषामुळे आपल्याला श्रीपादांच्या दर्शनाचा लाभ घडला म्हणून चौथा चोर आनंदात होता. वल्लभेषाला आपली चूक | कळली. हजार ब्राह्मणांना जेवण देण्याची ऐपत असूनही आपण चालढकल केली, त्याचीच ही शिक्षा भोगावी लागली, हे त्याला उमगले. आता तर त्याची ऐपत चार हजार ब्राह्मणांना जेवण देण्याची होती. त्यामुळे त्याने त्याप्रमाणे त्वरीत ब्राह्मण भोजन घातले.
श्रीपादांचे विराट स्वरूप
थोड्यावेळाने श्रीपादांनी डोळे उघडण्यास सांगितले. नंतर श्रीपाद बोलू लागले “माझ्या बाबतीत कारणाविना कार्य होत नाही. सृष्टी विधान चित्रविचित्र असते. मी निराकारी,पण निराकारात तुमच्या समोर हे विचित्रच! निर्गुण असून सगुण होऊन दर्शन देतो हेही विचित्रच. कालातीत असलो तरी काही काळ तुम्ही माझा अनुभव घेता. ही पण विचित्रच गोष्ट. सर्व शक्ती माझ्या हातात असतात. या अनंत कोटी ब्रह्मांडातल्या प्रत्येक अणू अणूत असणारा मीच. अणूरेणूला जोडणारा संकल्परूपी मीच! अणुअणुला वेगळे करून नवीन सृष्टी रचना करणाराही मीच! तिचा प्रलय करणारा रुद्ररूप पण मीच! याला ज्ञान म्हणतात, याला अज्ञान म्हणतात, असा बोध देत सर्व जीवांना माया जालात ढकलून विनोद पाहणाराही मीच! आर्त होऊन जीवाने हाक मारताच सहस्त्र बाहूंनी त्याला सांभाळून त्याची रक्षा करणारा अनादि तत्व मीच! सर्व जीवनात असलेल्या “मी”'चा विचार करणारा “मी”,पण मीच खरा आहे. अशा माझ्यात सर्व शक्तित्व, सर्वज्ञत्व, सर्वांतमर्यामित्त्व नसते तर तुम्हाला आश्चर्य वाटायला पाहिजे. पण आता ते व्यक्तरूपे अनुभवाला येत असतांना आश्चर्य कसले?''
परब्रह्म स्वरूप गुरुदेव श्रीपाद अशा प्रकारे बोलत असतानाच कोठून तरी घंटानाद ऐकू आला. आश्चर्य म्हणजे ती घंटा श्रीपादांच्या चरणाजवळ आली व काही वेळातच अदृश्य झाली.
स्त्री विषयी श्रीपादांचा मातृभाव
श्रीपाद म्हणाले, “श्रीपाद श्रीवल्लभाचा हा अवतार म्हणजे सद्यःफल प्रसादाचा महावतार आहे. आमचे नामस्मरण केल्याशिवाय कुठल्याही अवधूताला पूर्ण सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. त्यांची योगविघ्ने दूर होऊ शकत नाही. अरे! वल्लभेषा! ऐक! तुझे आईवडील लहानपणीच वारले. तुझ्या चार काकांनी तुला खुप त्रास दिला व तुझी स्थावर संपत्ती हडप केली तुला भिकारी केले. हे सर्व मला माहीत आहे. त्यांची मुलेही तुझ्याशी वैर भावाने वागतात. हे पण मला माहीत होते. मेलेले तुझे काका, चोर होऊन जन्मास येतील. कुरवपुरला तू येत असताना तुझा वध करून तुझे धन हडपतील. तू माझे स्मरण करताच, मी लगेच तेथे येऊन त्रिशुलाने त्या तीन चोरांचा वध केला. चौथा अल्पदोषी असल्यामुळे त्याला सोडले.'' करुणामय श्रीपादांचे बोलणे ऐकून वल्लभेषाच्या पत्नीचे भाव दाटून आल्याने ती रडू लागली. श्रीपाद म्हणाले, “माते! मी प्रत्येक स्त्रीमध्ये माझ्या जन्मदात्री अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीलाच पाहत असतो. त्या मातेच्या मांडीवर मी नेहमी बालकच! तू वाईट वाटून घेऊन नकोस. मी दिलेले हळकुंड जपून ठेव. तुमचे कल्याण होईल. तू अखंड सौभाग्यवती होशील. माझे बोल म्हणजे दगडावरची रेघ या सृष्टीतील कुठलीही शक्ती ते बदलू शकत नाही.
मला गायत्री मंत्राचा उपदेश देणारे माझे पहिले गुरु म्हणजे माझे वडील. मी त्यांचे नाव चिरस्थायी करणार. त्यासाठी वडीलांच्या नावातील नरसिंह या शब्दात सरस्वती शब्द मिसळून नरसिंह सरस्वती नावाने नंतरचा अवतार घेणार. आमच्या आजोबांचे बापन्नाचार्यांचे रूप चिरस्थायी करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवतारात हुबेहुब त्यांचे रूप घेणार. माझे आजोबा माझे दुसरे गुरु. त्यांच्या जवळच मी वेदविद्या ग्रहण केली. तुम्ही आत्ता बघितलेली ही घंटा आमच्या आजोबांकडे होती. माझ्या संकल्पा प्रमाणे साधकांना करण्यासाठी ही घंटा अनेक देशात, प्रांतात फिरत असते. ती भूमीवर तर फिरतेच, पण कधी तिचा प्रवास भूगर्भातून पण होत असतो. शंकर भट्टा! तू रचणा-या श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताची तेलुगु प्रतीचा अठरावा अध्याय पीठिकापुरात पोहोचण्याच्या वेळी ही घंटा परत पीठिकापुरला पोहोचेल. अठरा हा आकडा जय रूप आहे. ही घंटा अनेक आकार बदलून माझ्या संकल्पाप्रमाणे वागते. आजोबांच्या घरी माझ्या नावाने मोठे संस्थान स्थापित होणार. त्यासाठी माझ्या प्रेमाचे चिन्हरूप म्हणून जय जय ध्वनी करणारी ही घंटा मी पीठिकापुराला पाठवीन.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥