अध्याय - ४०

 ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय - ४०


शंकरभट्ट व धर्मगुप्तांचे विचित्र अनुभव


आम्ही अनेक प्रवास साधनांनी प्रवास करीत होतो. कधी पायी तर कधी बैलगाडी तर कधी घोडागाडी. काही दिवस प्रवास केल्यानंतर त्रिपुरांतक नावाच्या महाक्षेत्रात पोहोचलो. त्रिपुरांतकेश्वराचे दर्शन घेतले. दिव्यानुभव सांगावे असे मला पुष्कळसे अनुभव येऊ लागले होते. आमच्या जवळ श्रीपादांच्या दिव्य पादुका होत्या. आम्ही प्रवास करीत असतांना श्रीचरण आमच्या सोबत चालत आहेत असे जाणवत असे. आमच्या पावलांबरोबर त्यांचेही पाऊल पडत आहे असा भास होत असे. बोलत असतांना तेही बोलत आहेत असे वाटे, जेवतांनाही ते आमच्याबरोबर जेवत आहेत असे वाटत होते. आमच्या शरीरात, रक्तात, नाडीत, कणा कणात श्रीपादांचे अस्तित्व जाणवू लागले. जीवात्मा हाच परमात्मा असतो, हा सिद्धांत ऐकला होता. शरीरात श्रीपादांचे चैतन्य भरलेले असून कुठल्याही प्रकारच्या स्पर्शाशिवाय अनुभव मात्र येत होते. अशा प्रकारची लीला आम्ही कधी ऐकली नव्हती.


त्रिपुरांतकेश्वराचे पुजारी भास्कर शास्त्री होते. त्यांनी मोठ्या आदराने आमचे स्वागत केले. तसे ते पीठिकापुर येथे राहणारे होते, पण इथे पुजारी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. ते षोडषी राजराजेश्वरी देवीचे भक्त होते. श्री पीठिकापुर निवासिनी श्री कुक्कुटेश्वरप्रभुंची पत्नी श्री राजराजेश्वरी देवीने, स्वप्नातच भास्कर शास्त्रींना मंत्र दीक्षा दिली होती. आम्हा दोघांना त्यांनी त्यांच्या घरचे आतिथ्य स्वीकारायचा आग्रह केला. आमच्या जवळ श्रीपादांच्या पादुका आहेत. हे त्यांना कळले होते. त्या पादुका आम्ही त्यांच्या देवघरात ठेवल्या. त्या पादुकातून दिव्य कंठस्वर ऐकू आले “बाळांनो तुम्ही धन्य आहात या पादुकांची भास्कर शास्त्रींनी पूजा करावी. सध्या या पादुका तांब्याच्या आहेत. भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बळामुळे त्या सोन्याच्या होतील. हिरण्यलोकातील काही महापुरुष त्या सुवर्णपादुका हिरण्यलोकात घेऊन जातील, तिथे त्या पादुकांचे पूजन अर्चन करतील. नंतर त्या कारण लोकात घेऊन जातील. नंतर महाकारण लोकात असणा-या माझ्याजवळ आणल्या जातील. माझ्या पादुका मी स्वतः घालीन. त्या पादुका धारण करून मी कारण लोकात येऊन त्या दिव्यात्म्यांना आशीर्वाद देईन. त्यानंतर हिरण्यलोकात जाऊन तिथल्या महापुरुषांना आशीर्वाद देईन. तेव्हा माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी लाभेल. तेंव्हा (१८०००) अठरा हजार महासिद्ध पुरुष त्या पादुकांना सोन्याच्या विमानाने माझ्या जन्मस्थानी घेऊन जातील. त्यास्थानी समंत्रक निरांजनांसह भूमीत ३६० फुट खोल, या पादुकांची प्रतिष्ठापना करतील. तिथे सुवर्णमय देहकांतील दिव्यनाग, नित्य या सुवर्ण पादुकांची पूजा करतील. चौसष्ट हजार योगिनी गण माझी पूजा करतील. त्या पादुका सुवर्ण सिंहासनावर ठेवल्या जातील. योगिनी गण व ऋषी संघाने नित्य परिवेष्टीत असलेला मी तिथे दरबार भरवीन. त्या भूमीजवळच तसेच दुसरे अदृश्य अगोचर असे स्वर्ण पीठिकापुर असेल. सामान्य लोकांना भूमीवरचे प्राकृत पीठिकापुरच दिसणार. योगदृष्टी असणा-यांना मात्र स्वर्ण पीठिकापूरचे दर्शन होईल. ज्या ठिकाणी भूमीत खोलवर माझ्या सुवर्ण पादुका प्रतिष्ठित होतील त्याच जागेवर वरती माझ्या पादुका पीठिकापुरात प्रतिष्ठित होतील. म्हणून तुम्ही सर्व आनंदाने राहा. भविष्यात अनेक चित्र विचित्र घटना घडणार आहे. माझ्या महासंस्थापनातील माझ्या पादुका दर्शनासाठी सतत माझ्या भक्तांची मुंग्यासारखी रांग लागेल.''


हे ऐकून आम्ही फारच आश्चर्य चकित झालो.श्री भास्करशास्त्री हे षोडषी राजराजेश्वरी देवीची आराधना करणारे परमभक्त होते. मी भास्कर शास्त्रींना विनंती केली की राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल काही तरी सांगा.


श्री राजराजेश्वरी देवी विवेकाचे प्रतीक


त्यावर भास्कर शास्त्री म्हणाले बाळांनो! राजराजेश्वरीचे चैतन्य, विचार करणाच्या आपल्या मनाच्या व इच्छेच्या सीमेवर आसीन असते. ती आपल्या साधारण विचार शक्तीला मेधाशक्तीत बदलते. विचार विवेक पूर्ण करण्यास ही माता मदत करते. संकुचित परिघातल्या आपल्या इच्छा विस्तृत करण्याचा ती अनुग्रह करते. साधारणपणे शक्ती व विवेक एका ठिकाणी असत नाही. परंतु राजराजेश्वरीच्या अनुग्रहामुळे शक्ती, विवेक एकत्र असू शकतात. दिव्य चैतन्यात अनेक अनंत असतात. त्यासाठी आपले मन विकसित करण्याची शक्ती ही देवी देते. विश्वस्त विशाल भावना वाढविण्यासाठी ही आपली मदत करते. दिव्य असे अद्भूत ज्ञान मिळविण्यासाठी शाश्वत अशी दिव्य मातृशक्ती आपल्यात व विश्वात आविर्भवित करण्यासाठी, स्थिर, शांत, महत्तर कार्य साधनेसाठी या देवीचा अनुग्रह फार आवश्यक आहे. राजराजेश्वरी देवी अनंत विवेकाचे प्रतीक आहे. ती जाणत नाही, असा एकही संकल्प नाही. सर्व विषय, सर्व जीव त्यांचे स्वभाव त्यांची संचालन शक्ती, या प्रपंचा तिच्यात पक्षपात बुद्धी अजिबात नाही. तिचे कुणावरही प्रेम नसते किंवा ती कोणाचाही द्वेष करीत नाही. साधना बळाने भविष्य दर्शन प्राप्त झाले, त्यांना ती विश्वासात घेऊन, त्यांना आपले अंतरंग भक्त म्हणून स्वीकारते.


या राजराजेश्वरी देवी पासून शक्ती मिळविणारे साधक, आपल्या विवेकबळाने विरोधी शक्तींचे निर्मूलन करू शकतात. ती त्या साधकाला जे फळ द्यायचे ती ते देत असते. ती विश्वाशी कुठलाही अनुबंध न ठेवणारी म्हणून अलिप्त असते. ती प्रत्येकाशी त्याच्या प्रकृती प्रमाणे आवश्यकतेप्रमाणे, सामथ्र्याप्रमाणे व्यवहार करीत असते. त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांना पुढे नेत असते. अज्ञानींना त्यांच्या अज्ञान मार्गानेच जाऊ देते. त्यांचे स्वातंत्र्य ती मान्य करते. ते सुधरो अथवा न सुधरो ती काहीही करीत नाही. तिची करुणा अनंत व अकुंठित आहे. तिच्या दृष्टीने सर्वच तिची लेकरे आहेत. असुरांना, राक्षसांना, पिशाचांना पण ती लेकरांसारखीच वागवते. माणसाच्या दयेप्रमाणे तिची दया आंधळी नाही. तिची दया व विवेक दृढ असतो. परमात्म्याच्या आज्ञा मार्गात ती अजिबात ढवळाढवळ करीत नाही. तिच्या शक्ती प्रयोगाचे, ज्ञान हे केंद्र आहे. म्हणूनच आपल्याला तिचा अनुग्रह प्राप्त झाला असल्यास सत्य बहिर्गत होऊन सत्यज्ञान बोध होईल, अशा कृपेचा वर्षाव करते. तिची शक्ती प्राप्त करायची असल्यास, कर्तव्य दक्ष राहून सत्याचा शोध घेत राहावे लागते, तेव्हाच तिचा अनुग्रह शक्य आहे.


मी पीठिकापुरवासी असल्यामुळे श्रीपादांची माझ्यावर पूर्ण कृपा आहे त्यामुळेच मी राजराजेश्वरी दीक्षेत सफल झालो. आता माझ्या दीक्षेची वेळ झाली आहे. मी जास्तीत जास्त वेळ ध्यानात घालवतो. श्रीपाद कुठल्या परिस्थितीत पीठिकापुरहून संचाराला निघाले, हे मी तुम्हाला उद्या सांगेन. तुम्ही इथे यायच्या आधी मी समर्पित केलेला पुलिहारा (चिंचेचा भात) श्रीपादांनी थोडा स्वीकारला होता. त्यांनी मला राजराजेश्वरी रूपात दर्शन दिले होते. तो महाप्रसाद भक्षण करून तुम्हीही ध्यानाला बसा.''


॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥