अध्याय - ३७

 ॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय - ३७


छिन्नमस्ता देवीचे वर्णन


आम्ही बंगारप्पा व बंगारम्मा दंपतीचा निरोप घेतला. श्रीपादांच्या चर्म पादुका घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. ही वाट रानातून जात होती. एका वटवृक्षाखाली आम्ही विश्रांती घेत होतो. तिथे काही योगिनी आल्या. आम्हाला पाहताच त्या म्हणाला, “ही भयंकर वेळ आहे तुम्ही इथे येऊ नका. इथे आम्ही छिन्नमस्ता देवीची आराधना करतो आहोत. ही आराधना फार गोपनीय असते. इथे पुरुष प्रवेश निषिद्ध आहे. इतकेच नव्हे तर ही देवभूमी आहे. इथे आलेले कुणीही बाहेर जीवंत जात नाही.'' हे ऐकून आमचा श्वास जिथल्या तिथे रोखला गेला. इतक्यात अत्यंत तेजस्वी अशी योगिनी माता तिथे आली. तिचे डोळे लाल लाल होते. तिच्या सोबत आलेल्या योगिनींच्या हातात टोपलीत छिन्नमस्ता देवी होती. ती योगिनी माता आम्हाला उद्देशून म्हणाली, “आता तुम्ही आलाच आहात तर मी तुम्हाला साडी चोळी देते ती नेसा.'' त्यांनी साडी चोळी दिली व आमचे कपडे अग्निकुंडात टाकले.


आम्ही साडी चोळी नेसताच, आमच्या शरीरात पुरुषाच्या ऐवजी स्त्री रुपांत बदल झाला. स्वभाव, आवाजपण बदलला. योगिनी गणांनी आमचे नांव शंकरम्मा व धर्मम्मा असे ठेवले. त्यांनी आम्हाला जेवायला मांस पदार्थ व प्यायला मद्य दिले !


दिवसा माणूस पण रात्री वाघासारखे फिरणा-या मर्लपूलि वाघाबद्दल(व्याघ्रनर)ऐकले होते. पण अशा प्रकारच्या देवता पूजा असतील, योगिनीगण संकल्प मात्रेतच पुरुषांच्या स्त्रिया बनवतील, अशी स्वप्नांत देखील कल्पना केली नव्हती. तिथे मशाली लावल्या गेल्या. योगिनी भयप्रद नृत्य करू लागल्या. योगिनीमाता म्हणाली, “कबंध मुनी हे परिवर्तनशील जगाचे अधिपती आहेत. त्या परिवर्तनशील शक्तीलाच छिन्नमस्तादेवी म्हणतात. या जगात वृद्धी व क्षय नेहमीच होत असतो. क्षीणत्व कमी होऊन विकास पातळी वाढते, तेव्हा भुवनेश्वरी देवी प्रगट होते व याच्या विरुद्ध स्थितीत म्हणजे विकास पातळी कमी होऊन क्षीणत्व वाढले की छिन्नमस्तादेवीचे प्राधान्य आढळते. या महामातेचे स्वरूप अत्यंत गोपनीय आहे."


एकदा पार्वती सख्यांसोबत मंदाकिनी नदीत स्नान करायला गेली. स्नानानंतर भूक लागली. त्या भूकेने ती कृष्णवर्णाची झाली. सख्यांनी जेवण मागितले. “थोडा वेळा थांबा देते.'' म्हणाली. असे दोन तीन वेळा झाले. थोड्या वेळाने महादेवीने खड्गाने स्वतःचा शिरच्छेद केला. तिथून तीन रक्तधारा निघाल्या, दोन धारा तिच्या सख्यांनी प्राशन केल्या व एक धार ती स्वतःप्याली.


अर्धरात्री छिन्नमस्तादेवीची उपासना केली असता, चांगले फळ मिळते. शत्रूवर विजय मिळविण्यासाठी, शत्रू समूह स्तंभित करण्यासाठी, राज्यप्राप्तीसाठी व मोक्षप्राप्तीसाठी, हिची उपासना करावी. दिशा हेच या मातेचे वस्त्र ! तिच्या नाभीत योनीचक्र असते. कृष्ण (तामस), रक्त(राजस) या गुणांनी युक्त अशा, सख्या सतत तिच्यासोबत असतात. शिरखंडन केल्यावर देखील असणे, हा योग परिभाषेत परिपूर्ण अंतर्मुखतेचे प्रतीक मानतात. अग्निस्थान असलेल्या मणिपूर चक्रात छिन्नमस्ताचे ध्यान करतात. हिरण्यकश्यपू हिचीच उपासना करीत असे.


आम्हाला हे सर्व मोठे भयप्रद व विचित्र वाटत होते. इतक्यात मध्यरात्र झाली. चित्र विचित्र वाद्यांच्या आवाजाने व नृत्य गीताने वातावरणात नुसता कोलाहल माजला.


ह्या दोन स्त्रियांचा बळी द्यावा''असे योगिनीगण म्हणू लागला. त्यासाठी त्यांना आम्ही योग्य वाटलो. त्यांनी आमच्या गळ्यांत कडूनिंबाची पाने बांधली. कपाळावर मोठे मोठे टिळे लावले. धारदार तलवारींनी आमच्या माना कापल्या. तेंव्हा रक्तधारा वाहू लागल्या योगिनी गण मदोन्मत्तपणे रुधिरपान करीत होत्या. आमचे डोके एकीकडे व धड एकीकडे पडले होते. तरी पण आम्ही सजीव आहोत, असे आम्हाला जाणवत होते. शरीरात जळल्यासारखे वाटत होते. योगिनी गणांच्या अत्यंत क्रूर असा निम्नश्रेणीच्या क्षुद्रविद्येचे आपण बळी ठरलो, अशी आमची भावना झाली.


इतक्यात आम्हाला झोप आल्यासारखे वाटले. त्या निद्रामय स्थितीत अस्पष्ट आकारात प्रकाश दिसला. तो प्रकाश जसा जसा जवळ येत होता, तसा तसा योगिनी गण हवेत अदृश्य होत आहेत, असे वाटले. आमची मस्तके धडाला चिकटली होती.


उषःकाल व्हायला अजून दोन-तीन तास वेळ होता. आम्ही झोपेतून सहजच जागे झालो. अंगावर साडी चोळी होती. पण स्त्री लक्षणे अदृश्य होऊ लागली. पुरुष लक्षणे दिसू लागली. अग्निकुंडात दग्ध झालेल्या आमच्या कपड्यांच्या जागी नवीन वस्त्रे होती. आम्ही स्नानसंध्या करून नवीन वस्त्र धारण केली.


इतक्यात आम्हाला एक वाटसरू भेटला. तो म्हणाला, “अहो! काल रात्री तुम्ही जे बघितले, त्या सर्व योग प्रक्रिया आहेत. त्या अत्यंत रहस्यमय आहेत. तुमच्या शरीरातील स्त्रीत्व परिशुद्ध केले गेले. प्रत्येक शरीरात स्त्रीत्व व पुरुषत्व दोन्ही असतात. ते दोन्ही शुद्ध झाल्याशिवाय योग शक्ती विश्वचैन्यातून प्रवाहित होत नाही. तुमच्या शरीरातआता विश्वचैतन्यातून हवी तितकी शक्ती प्रवाहित होत राहील. आत्म्याला स्त्री पुरुष हा भेद नाही. ती या दोन्ही तत्वाच्या अतीत असून त्याच्या आधाराने असतात.


तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे योगिनी गणांच्या असाधारण योग प्रक्रियेत अपार कृपा संपादन केली आहे. अत्यंत कष्टसाध्य असे तुमचे सुषुम्नामार्ग उघडले गेले आहेत. यापेक्षा तुम्हाला काय हवे? इतके महद्भाग्य तुम्हाला प्राप्त होण्याचे कारण म्हणजे तुमच्याजवळ असलेल्या श्रीपादांच्या चर्म पादुका होय. चर्म देह चैतन्यातून तुम्ही सुटून चैतन्यप्रवाह रूपी दिव्यत्वाच्या अनुसंधानात पोहोचलात. श्रीपादांची दिव्य लीला तेच जाणतात!''


॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥