॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय - ३५
उग्र तारादेवी विवरण
दुष्कर्म उपासकाला श्रीपादांनी शिक्षा करून रक्षा करणे
आम्ही शरभेश्वर शास्त्रींचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. श्रीपादांचे नामस्मरण हेच इहलोक व परलोकाचे साधन होय. हे आमचे ठाम मत होते. आम्ही थोडे दूर चालून जाताच आम्हाला एक आश्रम दिसला. सिद्ध नावाच्या महर्षीचा तो आश्रम होता. ते पूर्ण वैरागी व कौपीनधारी होते. आश्रमाच्या अंगणात उभ्या असलेल्या माणसाने आम्हाला विचारले, “शंकरभट्ट व धर्मगुप्त तुम्हीच का?'' आम्ही होकार देताच,ते आम्हाला आत घेऊन गेले. आत तारादेवीची मूर्ती होती. सिद्ध महर्षी तारादेवीचे उपासक आहेत, हे कळाले. दुपारची वेळ होती पुजेनंतर भजन झाले. त्यानंतर सुग्रास जेवण मिळाले.
सिद्ध महर्षी म्हणाले, “बाळांनो ! तुम्ही येणार हे श्रीपादांनी आधीच कळविले होते. महागुरुंच्या आदेशावरूनच तुमचे आतिथ्य केले. मी तारादेवीचा उपासक आहे. ती वाशक्ती देणारी, भयंकर विपत्तीपासून भक्तांचे रक्षण करणारी असल्यामुळे हिला नीलसरस्वती म्हणतात. तीन हयग्रीव आहेत. एक विष्णू अवतार, दुसरे महर्षी, तिसरा एक राक्षस हयग्रीव नावाने राहत होता. त्या हयग्रीव राक्षसाच्या वधासाठीच तारादेवी नील सरस्वती स्वरूपधारिणी झाली. या देवीच्या उपासनेने सामान्य माणूस बृहस्पती सारखा विद्वान होतो. भरत वर्षात पहिल्यांदा तारोपासना करणारे वशिष्ठ महर्षी आहेत. त्यामुळे हिला वशिष्ठाराधित तारादेवी असेही म्हणतात. मी तारोपासना करीत असून देखील मला कधी तारादेवीचे दर्शन झाले नाही. मात्र मिथिला नगरातील महिषी या गावी उग्रतारा सिद्धपीठाचे दर्शन झाले. तिथे तारा, एकजटा व नीलसरस्वती अशा तीन मूर्ती एका स्थानात आहेत. मधली मूर्ती मोठी व दोन्ही बाजूला लहान मूर्या आहेत. तिथेच उपासना करून वशिष्ठ महर्षीनी तारोपासना सिद्धी मिळविली होती. असे वडील मंडळी सांगतात.
उग्रतारादेवीचे दर्शन घेतल्यानंतर, मी तिथे एक गोड सुंदर बालिका पाहिली. तिच्या पायातल्या पैजणाचा नद मोठा सुश्राव्य व मधुर होता. ती बालिका चालतांना तो पैंजणाचा नाद माझ्या हृदयात प्रतिध्वनित होऊ लागला. ती बालिका म्हणाली, “बेटा, तू कुठे कुठे फिरत आहेस? मलाच शोधत फिरत आहेस हे खरे ना?'' हे ऐकून मी दचकलोच. हीच उग्रतारादेवी आहे की कुणी वेडी मुल आहे? परंतु मी तिला वेडी बालिका असे कसे म्हणेन?
तारा भगवती शिवावर प्रत्यलीढ मुद्रेत (अभयकर व एक पाय खाली सोडलेला व एका पायाची मांडी आहे अशा स्वरूपात) आसनस्थ झालेली असते. तिचा वर्ण नील (सावळा), ती त्रिनेत्रधारी असून तिच्या हातात कात्री, कपाल व खड्ग असते.. तिने व्याघ्रचर्म धारण केलेले असते. ती मुंडमाला घालते. भोग मोक्ष प्रदायिनी हे त्या देवीचे वास्तवरूप आहे. मी पाहत असलेल्या १२-१३ वर्षाच्या बालिकेचे रूप फार मुग्ध,मोहक, मनोहर होते. मी इतका अवाक झालो की त्या बालिकेला मी काहीच उत्तर दिले नाही.
इतक्यात त्या बालिकेचे वय वाढू लागले व रूपही बदलू लागले. तेजोभरित शरीर वर्ण असलेले बालकरूप तिने धारण केले. शरीरवर्ण सोन्यासारखा दिसू लागला. शरीरातला कण न कण तेजःपुंज दिसत होता. आता त्या बालकाचे नेत्र योग्यासारखे प्रशांत करुणामय दयामय दिसत होते. बालरूपातले पैंजण तसेच होते पण आता हे घट्ट झाल्यामुळे त्या बालकाने मला काढायला सांगितले. मी पैंजण काढले, तर तो बालक म्हणाला, “हे पैंजण तुझ्याजवळच ठेव. या पैंजणात जीवशक्ती आहे. तू कुठे जायचे? काय खायचे? कुणाशी बोलायचे हे सर्व ते पैंजणच ठरवतील.'' एवढे सांगून तो बालक अदृश्य झाला.
त्यानंतर मी कालिघाटाला गेलो, तेथे कालीमातेचे दर्शन घेतले. दक्षिणेकडे निघालो. जगन्नाथपुरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले. तिथून सिंहाचल क्षेत्राला गेलो. नशीबाने पादगया क्षेत्र असलेल्या श्री पीठिकापुरला आलो. श्री कुकुटेश्वराचे दर्शन घेतले. नंतर त्या मूर्तीच्याच ठिकाणी मला एक वारूळ दिसले. त्या वारुळात एक सर्प देवता राहत होती. दत्त दर्शना नंतर मला त्या सर्प देवतेचे दर्शन झाले. त्या दर्शनाने माझी कुंडलिनी जागृत झाली. माझे शरीर माझ्या स्वाधीन राहिले नाही. मी वेड्यासारखा तारामातेचा नामोच्चार करीत मोठमोठ्याने ओरडत होतो. योगायोगाने मी नरसिंह वर्मा नावाच्या जमिनदाराच्या घराजवळ आलो. महिषी गावात पाहिलेले सर्व दृश्य मला पुन्हा दिसू लागले. त्या बालिकेचे दर्शन, तिचे वय वाढणे, रूप बदलणे, बघता बघता ते बालकरूप धारण करणे, वगैरे त्या दिवशी बघितलेला तो दिव्य बालकच आज प्रत्यक्ष माझ्यासमोर उभा होता.
वर्माकडे एकाच माणसाने ओढायचा छकडा होता. त्या दिव्य बालकाला त्या छकड्यात बसून आजोबांच्या घरापर्यंत जायचे होते. वर्गांनी गाडी ओढणाच्या नोकराला हाक मारली. तो येऊन उभा राहिला. त्या दिव्य बालकाने आपल्याबरोबर त्या नोकरालाही छकड्यात बसायला सांगितले व मला ती गाडी ओढायला सांगितली. मी नाही म्हटले, तेंव्हा तो बालक मला म्हणाला, “तू जर ही गाडी ओढली नाही तर तुझी चामडी सोलेन. मी आधीच चांभार आहे. चामडीकाढून चपला करणे माझी वृत्तीच आहे. गाय, म्हशीच्या चामड्यापेक्षा तुझे चामडे श्रेष्ठच असणार.''
मला आता गत्यंतर नसल्यामुळे, मी गाडी ओढण्यास तयार झालो. त्या बालकाच्या हातात काठी होती मी मोठ्या कष्टाने ती गाडी ओढू लागलो. तो दिव्य बालक मला त्या काठीने मारीत होता. दोघांचा भार वीस माणसांच्या भारा इतका होता. दुःख भार सहन करीत रक्त बंबाळ होऊन कशी बशी गाडी ओढत मी आजोबांच्या घरापर्यंत पोहोचलो. बालकासोबत आलेला नोकर माझी स्थिती पाहून कळवळत होता. पण तो बालक मात्र कर्कश व मजा बघणाच्या कसायासारखा वाटला. तो त्या नोकराला म्हणाला, “या दुरात्म्याबद्दल जराही प्रेमभाव दाखविलास तर तुलाही शिक्षा करावी लागेल.'' मी अर्धनग्नच होतो. तो बालक घरात गेला व लाल मिरचीची पूड घेऊन आला व रक्तं वाहत असलेल्या माझ्या जखमांवर ती मिरचीची पूड लावू लागला. महिषी गावात दिलेले ते पैंजण मी माझ्या कमरेला बांधलेले होते.
इतक्यात त्या बालकाची आजी बाहेर आली. खरोखर ती कुणी पुण्यमूर्तीच असावी. तिला पाहताच माझ्या शरीराची आग शांत झाली. तिचे पती बापन्नार्य प्रसिद्ध सत्यऋषीश्वर होते. ते मला प्रेमाने म्हणाले, “बेटा तुझे गाव कोणते? तू कुठून आलास? थोडी विश्रांती घे जेवण कर व मग जा.'' मात्र हे ते हिंदी भाषेत बोलले. त्या नोकराने, श्रीपादांनी माझ्याशी जो दुष्टपणा केला, त्याचे वर्णन आजी आजोबांना ऐकवले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, “आजी हा नोकर खोटे बोलत आहे. याला ना जखमा झाल्या, ना त्यातून रक्त वाहिले. ते घामाचे बिंदू आहेत. मिरचीची पूड नाही तर चंदनाची पूड लावली.'' त्या नोकराला बघायला सांगितले, तर श्रीपादांनी सांगितलेले सर्व खरे होते. तेव्हा बापन्नार्य म्हणाले. “तू सत्यव्रत आहेस. तू रक्तधारा म्हटली तर ती रक्तधारा असणार. घर्मबिंदू म्हटले तर घर्मबिंदू असणार. चंदन पूड म्हटले तर चंदनपूडच असणार. तू जे जिथे आहे असे म्हणशील तेच तिथे असणार. तू साक्षात् उग्रतारारूपी आहेस, असे मला वाटते. उग्रतारादेवी वाचा सिद्धीचा प्रसाद देते, असे ऐकले होते. साक्षात उग्रतारा तूच, तुझ्या संकल्पाप्रमाणे तूच, तिथल्या वस्तूंचे स्वभावधर्म बदलू शकतोस. पण आता तुझे ते लीला विनोद थांबव व त्या अभाग्या कृपा कर.''
त्यावर श्रीपाद म्हणाले. आजोबा, तुम्ही खरे सांगत आहात. माझा संकल्प लगेच सिद्ध होतो, हे मी सांगितलेच आहे. ते यथार्थ आहे की नाही, यासाठी शास्त्राची मदत हवी. हा आगंतुक सद्ब्राह्मण आहे. हा उग्रताराची उपासना चांगली करतो. पण गुरुची अनुमती न घेता याने आपल्या मर्जीने संन्यासदीक्षा घेतली. याच्या आईने फार त्रास सोसून याला जन्म दिला. याच्या वडीलांनी मोठ्या कष्टाने याला लहानाचे मोठे केले. याच्या जन्मवेळी त्या मातेचे पुष्कळ रक्त वाहिले. जखमेवर तिखट चोळल्यावर जशा यातना होतात, तशा यातना तिने सहन केल्या. ते दोघेही मृत्यूनंतर या पीठिकापुरात जन्मले.
नरसिंह वर्माकडचा नोकर म्हणजे दुसरा कोणी नसून मागच्या जन्मीचा याचा पिता आहे व त्याची पत्नी म्हणजे याची पूर्वजन्मीची माता. मृताचे पिंडदान व्यवस्थित झाले नाही तर ते अनर्थकारक ठरते. या आगंतुकाने संन्यास घेतल्यामुळे, आईवडिलांचे पिंडदान केले नाही. याच्या या पापकर्मामुळे, करीत असलेल्या पुण्यकर्मामुळे, याला या पादगया क्षेत्र श्री पीठिकापुर येथे ओढून आणले आहे. थोड्या कष्टातच याचे पाप मिटल्यामुळे याचे दुर्भाग्य नाहीसे केले. शिशु मातृगर्भात नऊ महीने राहतो. काशी क्षेत्रात नऊ महिने नऊ दिवस नऊ घटका राहिले तर पितृशाप नाहीसे होतात. हे पीठिकापुर काशी समानच आहे. या आगंतुकाने नऊ दिवस या पूर्वजन्मातील माता पित्याची सेवा केली तर याचे पितृशाप नाहीसे होतील.'
श्रीपादांच्या आदेशानुसार वागून मी त्यांचे आशीर्वाद मिळविले. त्यांनी त्या दिवशी दिलेले पैंजण देवघरात जपून ठेवले. त्यानंतर मला उग्रतारा सिद्धी मिळाली. माझ्या तंत्रशक्तीने मी लोकांच्या आधी व्याधी बया करीत असतो. तुम्ही इथे यायच्या आधी श्रीपादांचे माझ्या अंतदृष्टीला दर्शन झाले व ते म्हणाले, “शंकर भट्ट व धर्मगुप्त नावाचे गृहस्थ या रस्त्याने येत आहेत. त्यांना पोटभर जेवण दे. आश्रमात त्यांची राहायची सोय कर व ही पैंजणे त्यांना बक्षीस म्हणून दे ही त्यांची आज्ञा होती.'' असे सविस्तरपणे सांगून त्यांनी आम्हाला ती पैंजणे दिली.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥