॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय - ३९
नागेंद्र शास्त्रींशी समागम
आम्ही कालनागमणी घेऊन प्रवास करीत होतो. आता श्री पीठिकापुरला केव्हा पोहोचतो व तिथले दर्शन केंव्हा घेतो, अशी मनाला तळमळ लागली होती.
काल नाग स्वरूप
एका ब्राह्मणाकडे आम्ही आतिथ्य घेतले. त्यांचे नाव नागेंद्रशास्त्री. ते चांगले मंत्रवेत्ते होते. त्यांच्याघरी अनेक नागसाप फिरत होते. ते कुणालाही हानी करीत नसत म्हणे. सर्वांना ते आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे पाळत होते. सर्प त्यांच्या अंगाखांद्यावर यथेच्छ खेळत असत. दिव्य नागांवर मणी असतो. अनेक वर्ष त्यांनी नागदेवतेला प्रार्थना केली होती, की त्यांना पूजेसाठी कालनागमणी प्राप्त व्हावा.
नागमणी महिमा
नागेंद्र शास्त्री सांगू लागले, “बाळांनो! आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे! श्रीपाद पंधरा वर्षांचे असताना मी पीठिकापुरला गेलो होतो. पादगया क्षेत्राचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्ताच्या गळ्यात कालनाग पाहिला. त्यावर मणी होता. कालशासन करणाच्या नागालाच कालनाग म्हणतात. त्यांना मणी असतोच. ते मणी रात्रीच्या वेळी दिव्यतेजाने झळकत असतात. त्यांच्यात कुंडलिनी शक्ती असते. महर्षी प्रमाणे ते नेहमी योगध्यानात असतात. मानवांनाच नाही तर नागांनाही अनेक स्थिती असतात. कालमणी सर्वसाधारणपणे मनुष्याला दिसत नाही. कालनागाच्या फणीवरील मण्यामध्ये, मंगळ ग्रहामुळे येणारे अशुभ फल निवारण करण्याची शक्ती असते. ती अशुभ स्पंदने नागमण्यात लय पावतात व त्यातून शुभस्पंदने निघतात. ती मंगलमय स्पंदने मंगलग्रह पीडिताचे कल्याण करतात. मंगलग्रह आपल्या जन्म पत्रिकेत बरोबर नसेल तर अनेक पीडा उद्भवतात. जीवनात कठीण परिस्थिती निर्माण होते. घरातल्या लोकांशी आप्तबांधवांशी, मित्रांशी विरोध, कर्जबाजारी पणा, उपवर कन्यांचा योग्य वेळी विवाह न होणे, त्या तशाच अविवाहित राहणे, विवाह झाले तरी मुले न होणे, कुठल्याही कामात यश न मिळणे, या सर्व अनर्थकारक गोष्टी मंगळ ग्रह नीट नसल्यास होत असतात.
स्वयंभू दत्ताच्या दर्शनानंतर त्या कालनागमणींची प्राप्ती व्हावी अशी तीव्र इच्छा अंतरात जागृत झाली. कालनागमणी मिळाला तर जीवनात उत्तरोत्तर यशाची अभिवृद्धीच होत राहील, अशी आशा वाटू लागली.
श्रीपाद पादुका महिमा - नागदोष निवारण नियम
मी नरसिंह वर्मांच्या वाड्यासमोरून जात होतो. गुरु सार्वभौम श्रीपाद, त्यांच्या अंगणात लीला विनोदाने, झाडांना पाणी देत होते. नरसिंह वर्मा झाडांना आळे करीत होते. तिथे एक औदुंबराचे झाड होते. त्या झाडाला पाणी भरपूर मिळावे म्हणून औदुंबराला ते खूप मोठे आळे करीत होते. इतक्यात तिथे त्यांना ताम्रपादुका दिसल्या. त्या सोळा वर्षांच्या मुलाच्या होत्या. त्यावर श्रीपादांचे पादसामुद्रिक (तळपायावरील शुभचिन्ह) कोरलेले होते. इतक्यात ‘‘नागेंद्र शास्त्री इकडे ये'' अशी हाक मला ऐकायला आली. मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे गेलो. नरसिंह वर्मांनी त्या पादुका नारळाच्या पाण्याने धुतल्या. त्या श्रीपादांच्या पायाजवळ ठेवल्या. पादुकांना पदस्पर्श करून पूजा करण्यासाठी त्या आपल्याला परत देतील. असे नरसिंह वर्माना वाटले. पण श्रीपादांचे संकल्प वेगळेच असतात.
त्या पादुका श्रीपादांनी मला दिल्या व म्हणाले, “नागेंद्र शास्त्री! तू नागेंद्र पीठ स्थापन करून तिथे या पादुकांची पूजा कर. तुला काल नागमणी मिळावा असे वाटते ना? ब-याच दिवसांपासून हा विचार तुझ्या मनात घोळत आहे. अरे स्वतः कालनाग, निरंतर आपल्या मण्यांनी ज्या स्वामीची पूजा करतात, ते महास्वामी मीच! या दिव्या पादुका माझ्याच आहेत. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू या पादुकांची पूजा कर. आधीव्याधींनी त्रस्त झालेले लोक तुझ्याकडे येतील. या पादुकांची पूजा करून त्याचे तीर्थ त्या लोकांना दिल्यास, त्यांच्या सर्व आधीव्याधींचे निवारण होईल. सर्व नागदोषांचेही निवारण होईल.
नागदोष शांत करण्यास जी दक्षिणा द्यावी लागते, त्यात पती पत्नीच्या आई वडीलांचे ही धन मिसळलेले असावे लागते. या बांधून दिलेल्या नियमांचे नक्की पालन करावे. पुरुषाला आपल्या नागदोष निवृत्तीसाठी दक्षिणा द्यायची असेल, तर त्याने आपल्या सासरकडून आणि इतर सगळ्यांकडून, म्हणजेच पत्नीच्या माहेराकडून धन घेऊन त्या दक्षिणेत मिसळावे. तसेच स्त्रीनेही नागदोष निवृत्तीसाठी आपल्या सासरकडून धन घेऊन द्यायच्या दक्षिणेत मिसळावे. अशा प्रकारे पती पत्नीने नागदोष निवृत्तीसाठी उभयतांच्या माहेराकडून धन घेऊन दक्षिणेत मिसळून ती दक्षिणा द्यावी. कन्येच्या नागदोषाचा परिहार करायचा असेल तर दक्षिणेत थोडे द्रव्य मामाचे व थोडे पित्याचे असावे. असे केल्याने पूर्णपणे नागदोषाचे निवारण होते. नागदोष परिहारार्थ कुणीही असो, माहेरचे धन त्यात अंतर्भूत केल्याशिवाय नागदोष परिहार होत नाही. हा नियमचे ठरविला गेला आहे. बेटा! नागेंद्र शास्त्री! माझे वचन जसेच्या तसे पाळ. लोक कल्याणार्थ तुझ्या नागशास्त्र वैद्यकीचा उपयोग कर.''
दत्ताराधकांना मिळणारे विशेष फळ
पुढे श्रीपाद मला म्हणाले, “काही काळानंतर शंकरभट्ट व धर्मगुप्त तुझ्याकडे येतील. तो पर्यंत तू आराधना केलेल्या या पादुका त्यांना दे व त्यांच्याजवळचा नागमणी तू स्वीकार. शरीर धर्माचा, मनाचा, प्राणाचा काळ ठरलेला असतो. आत्मा मात्र कालातीत आहे. ते ग्रह, नक्षत्र असेपर्यंत तो काळ असतो. वृद्धी, क्षय हे कालाधीन असते. अनेक ब्रह्मांड निर्माण होतात, त्यांची वृद्धी होते. काही काळ स्थिर राहून त्यांचा पुन्हा विलय होतो. सगळा काल महिमाच! ते कालस्वरूप माझ्या आधीन आहे. माझी आराधना करणाच्यास कालपुरुष नेहमी अनुकूल असतो. भूतप्रेत पिशाच्च या महाशक्ती पण दत्ताची आराधना करणा-यांना काही करू शकत नाही. या सृष्टीतील सर्व प्राण्यांपेक्षा मी बलवान आहे. माझे बळ घेऊनच जीवराशींची वृद्धी होत असते. गर्वाने मदोन्मत झाल्यास त्यांच्यातले बळ नाहीसे होते. गर्व, अहंकार हा सर्व अनर्थाला कारणीभूत असतो. माझी आराधना करीत सतत माझे स्मरण करणारे नित्य संतुष्ट व आनंदी असतात.
त्यांनी माझ्या जेवणाची सोय नरसिंह वर्मीकडे केली. वर्मा म्हणजे अन्नदान प्रभू! अन्नदानावर दत्तप्रभूचे मोठे प्रेम आहे. कुणीही, कुठेही उपाशी असेल तर त्यांना मोठे दुःख होते. ते सर्व प्राणी मात्राचे हित करणारे आहेत.
श्रीपाद महास्वामींचा निरोप घेऊन मी निघालो. तुम्ही बघत आहात, त्या जागी मी आश्रम बांधून राहत आहे. माझ्याकडे येणा-यांना त्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे ज्ञानबोध देत असतो.
इतक्यात माझी पत्नी वारली. मी काळजीतच होतो. त्याचवेळी एका न्हाव्याची पत्नी सर्पदंशाने वारली. न्हावी तिला माझ्याकडे घेऊन आला. मला अवगत असलेल्या नागविद्येमुळे, मी एका सापाला बोलावले व तिच्या शरीरातले विष काढायला सांगितले. पण तिचा जीव त्या शरीरात प्रवेश करायला तयार नव्हता. तिची वृत्ती फार वेगळी होती. तिला लोकांना त्रास देऊन त्यांचे दुःख पाहतांना मोठा आनंद होत असे. न्हावी तिच्या प्राणाची भीक मागत होता. तेव्हा मी त्याला म्हणालो, “नुकत्याच मेलेल्या माझ्या पत्नीचे प्राण मी तुझ्या बायकोच्या शरीरात टाकू शकतो. परंतु नंतर तुला नव्याने सजीव झालेल्या बायकोला माते समान जपावे लागेल.'' माझे म्हणणे त्याने मान्य केले.
माझ्या पत्नीचा आत्मा न्हाव्याच्या बायकोच्या शरीरात परावर्तित केला. म्हणजे माझी बायको पुनर्जीवित झाली. पण न्हाव्याची बायको दुष्ट असल्यामुळे तिच्या शरीराच्या नाड्या दूषित झाल्या होत्या. त्या दूषित शरीरात राहताना माझ्या पत्नीला कंप सुटला. जळल्यासारखे वाटू लागले. तो त्रास असह्य होऊन, ती ते शरीर सोडून जाते, असे म्हणू लागली.
पण आमच्या गावातल्या न्हावी लोकांनी या घटनेचा विपरीत अर्थ लावला. नागेंद्र शास्त्री नावाच्या ब्राह्मणाने न्हाव्याच्या पत्नीला जीवंत करून, तो तिच्याशी अवैध संबंध ठेवतो आहे. हा त्या न्हाव्यावर मोठा अन्याय होत आहे. असे आजूबाजूच्या ब्राह्मणांना सांगून मला कुल बहिष्कृत करावे. तसेच मंत्रतंत्रामुळे होणा-या उत्पन्नाचा ३/४ भाग न्हाव्याला नुकसान भरपाई म्हणून द्यावा व १/४ भाग स्वत:साठी शास्त्रीने ठेवावा, असे त्या न्हावी कुलाच्या प्रमुखाने ठरवले व मला तसे बजावले.
मी मोठ्या संकटात पडलो. खरे काय घडले ते सविस्तर सांगूनही कुणाचा विश्वास बसेना. मरण पावलेली न्हाव्याची बायको पण काही बायकांच्या अंगात येऊन म्हणून लागली, “मी शास्त्रीची पत्नी! शरीर नसलेली प्रेतात्मा! त्याचे हे अनैतिक कृत्य थांबवणे कुल श्रेष्ठांचे कर्तव्य आहे. जोवर हे होत नाही तोवर मी इथून जाणार नाही.'' असे म्हणून ती अधिकच घाबरवू लागली. कुल श्रेष्ठ ही क्रोधावेशात आले. त्यांनी मला व न्हाव्याच्या पत्नी रूपात असलेल्या माझ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली.
मी श्रीपादांना शरण गेलो, श्रीपाद म्हणाले, “तू पती असलास तरी तुझ्या पत्नीचा आत्मा न्हाव्याच्या बायकोत टाकण्याचा तुला अधिकार नाही. तू हे योग्य केले नाहीस. तसेच आता तू तुझ्या मंत्र शास्त्र द्वारा पीडितांची निरपेक्ष सेवा करावी. तू धनाशा ठेवू नकोस. ते जे स्वखुषीने देतील तेव्हढेच द्रव्य स्वीकार. मी श्रीपादांची आज्ञा पाळली. माझ्या पत्नीचा आत्मा ते शरीर सोडून निघून गेला. नंतर त्या शरीराचे दहन केले
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥